Wednesday, July 5, 2023

सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला. सदर प्रशिक्षण वर्गात ३५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 

             पदवीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे या बरोबरच विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त करून बेरोजगार न राहता ते स्वतः काही तरी मिळवून स्वतः च्या गरजा भागविण्यासाठी गरजेचे आहे. म्हणून मराठी विभागाच्या वतीने एक महिन्याच्या या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड व मराठी विभाग प्रमुख डॉ उज्ज्वला पाटील यांनी केले.     

                   वरील प्रशिक्षण वर्ग पूर्ण केलेला विद्यार्थी कोणत्याही लहान मोठ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन उत्तमरीत्या करु शकतो. एकदा का तो चांगले सूत्रसंचालन करतो ही बातमी समाजात पसरली की आपोआप त्याला अनेक कार्यक्रमाचे आयोजक बोलीतील. त्याला काम मिळेल आणि त्यातून मोबदला ही मिळेल. या प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक डॉ उज्ज्वला पाटील हे होते. तर अभ्यागत वक्ते म्हणून प्रा. विलास सुर्वे यांनी सहकार्य केले. हे प्रशिक्षण वर्ग मा. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले.  





Monday, February 27, 2023

मराठी भाषेवर मनापासून प्रेम करा प्रा. सुभाष कांबळे

वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या प्रती सदभावना व्यक्त करणे. मराठी भाषेवरील प्रेम वृद्धिंगत व्हावे आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषिकांनी मराठी भाषेवर मनापासून प्रेम करावे हीच या दिवशी मनोकामना बाळगून मराठीचा सन्मान करू असे प्रतिपादन प्रा. सुभाष कांबळे यानी केले.

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते तर उपस्थितामध्ये प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील, प्रा. ए. जी. खोत, नवोदित साहित्यिक सूरज साठे आदी होते. 


       प्रा. सुभाष कांबळे पुढे म्हणाले की, भारतातील २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधे १५ वी तर भारतातील ३ री भाषा आहे. आताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा देखील येणे गरजेचे असल तरी मराठी भाषेचे महत्त्व देखील टिकवून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय मनोगत मांडताना प्राचार्य डॉ महेश गायकवाड म्हणाले की मराठी भाषेबद्दल आदराची भावना, प्रेम दाखवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो- महाराष्ट्रातील प्रत्येक जनमानसाला सदैव उपयोगाला येणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख केला जातो याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी नवोदित साहित्यिक सूरज साठे  याचा मुक्ता साळवे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला- या समारंभास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.








Tuesday, January 24, 2023

मराठी विभागात कवी संमेलनाचे आयोजन

जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरते. - प्रा. प्रतिभा पैलवान

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात मराठी विभाग व प्रीतीसंगम हास्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध कवयित्री प्रा. प्रतिभा पैलवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील उद्गार काढले. त्या पुढे म्हणाल्या की, कित्येकदा जगलेल्या आयुष्यातूनच नवनवे सुचत जाते. भावनाची उत्स्फूर्तता शब्द जुळवत जातात. आणि सुरेख अशी काव्यनिर्मिती होते. अनेकदा ही काव्यनिर्मिती इतरांना प्रेरक, मार्गदर्शक ठरत असते त्या त्या परिस्थितीतील गोड कुपी म्हणूनही लिखित काव्याकडे पाहता येईल. विद्यार्थ्यानी  देखील या काव्यनिर्मितीचा आनंद लुटावा असे सांगून स्वरचित काही कविताचे त्यांनी  सादरीकरण केले.तेव्हा उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले. 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, कविता हा अतिशय अर्थगर्भ प्रवाह आहे. त्यातील शब्द सौंदर्य  भावसौंदर्य,अथसौंदर्य टिपता आले पाहिजे. कविता म्हणजे भावनांचे सादरीकरण असते, तर आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पाटील म्हणाल्या की, कवीसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव देणारा महत्वाचा उपक्रम असून त्याद्वारे नव्या मराठी भाषा आपोआपच संवर्धित होईल.

यावेळी हास्य परिवाराचे सदस्य मा. आनंद कलबुर्गी, प्रा सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव, प्रा. अण्णा पाटील, प्रा. दयानंद कराळे, प्रा. अभिजित दळवी, प्रा. शोभा लोहार, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा. स्वप्नाली काळे, प्रसाद भस्मे, सचिन कांबळे, कु श्रुती कांबळे यांनी कविता सादर केल्या.




Sunday, January 8, 2023

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभागात अभ्यागत व्याख्यान संपन्न.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभागाच्यावतीने  कथा निर्मिती संकल्पना या विषयावर अभ्यागत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून काकासाहेब चव्हाण महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. राजेंद्र लादे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात कथेची निर्मिती कशी होते. कथानिर्मितीसाठी आवश्यक घटक, कथानिर्मितीतील उत्स्फूर्तता व कथानिर्मितीच्या क्षेत्रात विद्यार्थ्याना असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ उज्ज्वला पाटील होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात साहित्य हा समाज मनाचा आरसा असून समाजातील घडणाच्या अनेक घडामोडीचे  चित्रण आणि त्याचा मानवाशी असलेला संबंध यातून साहित्य निर्मिती होत असते .  सकस साहित्य निर्मिती नेहमीच चांगल्या  समाज उभारणीसाठी उपयुक्त असते. कथा हा वाङ् मयप्रकार यादृष्टीने महत्त्वपूर्ण  ठरतो असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी मराठी विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दयानंद कराळे यांनी केले तर आभार मराठी विभागाचा विद्यार्थी अक्षय घाडगे यांनी  मानले.




Friday, October 14, 2022

पुस्तके संस्कृतीचे मस्तक तर ग्रंथालये मंदिर आहेत.'- प्रा. श्रीधर साळुंखे

  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात वाचनप्रेरणा दिनाचे आयोजन

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात वाइ:मयमंडळ व ग्रंथालय विभागाच्यावतीने वाचनप्रेरणा दिन उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते  मा. प्रा. श्रीधर साळुंखे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मोबाईल ऐवजी पुस्तकावर बोट ठेवून वाचलेली अक्षरे काळजाला जाऊन भिडतात, मन शुद्ध करतात. तर गुरुजनांनी खांदयावर ठेवलेला हात आयुष्यात दिशा देता. चांगले मित्र जगण्याचे आधार असतात. त्यामुळे पुस्तकं. गुरुजन आणि चांगल्या मित्रांची आयुष्यात सोबत करा. तेच तुम्हाला प्रगतीचे मार्ग दाखवतील. विवेकी निर्णय घ्यायला सक्षम बनवतील, अंतर्मनावर संस्कार करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते, तर प्रमुख उपस्थिती मा हृषीकेश सारडा, मा. जयंत पालकर यांची होती.

प्रा. श्रीधर साळुंखे  पुढे म्हणाले की, पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक तर ग्रंथालय हे भडकावणार्‍या डोक्यांना शांत करणारे  मंदिर आहे. आयुष्याच्या पाऊलवाटेवर मार्गक्रमण करताना आपण स्वत:ला मात्र कधीच फसवू शकत नाही याचेही भान आपल्याला असले पाहिजे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाल की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्याना वाचनाचा संस्कार त्यांच्यात रुजावा या हेतूने वाचन कट्टा उपक्रम राबवला जात आहे. वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारे, आकलन शक्ती वाढवणारे माध्यम म्हणून पुस्तकाकडे आपल्याला पाहता येईल.

याप्रसंगी मराठी विभाग आणि मराठी साहित्य परिषद पुणे. शाखा सातारा यांच्यात सामंजस्य करारही झाला.  यावेळी या परिषदेचे सचिव मा. हृषीकेश सारडा उपस्थित होते.




Thursday, October 6, 2022

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात वाड्.मयमंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात भाषा विभागाच्यावतीने वाड्.मय मंडळ व 'शब्दगंध' भित्तिपत्रिकेचे उद्घाटन वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.  जी.  जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्र.  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते.

        प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, प्रचंड वाढती स्पर्धा आणि मोबाईलमुळे आलेले एकाकीपण तरुण पिढीला नैराश्यग्रस्त करीत आहे तरुणांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा. जीवनातील निराशा दूर करण्याचे सामर्थ्य साहित्यात आहे. साहित्य हे मानवी जीवनाचा आरसा आहे.  तेव्हा कोणतीही कथा, कादंबरी, कविता वा नाटक आपण समरसतेने, तल्लीन, एकरूप होवून वाचल्यास आपणास आनंद मिळतो म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनाबरोबरच साहित्याच्या निर्मितीकडेही वळाव यातूनच एखादा नवा साहित्यिक जन्माला येवु शकतो. 

          तर अध्यक्षीय मनोगतात प्र.  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, शब्दांच्या पावसात भिजलात तर नवीन शब्दांचे अंकुर फुटतील, नवीन साहित्य निर्मिती होऊ शकेल. या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.यू. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले.  पाहुण्यांचा परिचय  प्रा. रत्नाकर कोळी यांनी व आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सविता येवले यांनी केले. 






 




Monday, September 19, 2022

स्वप्न बघायला शिकल्या शिवाय माणूस मोठा होत नाही. मा. प्रा. विनायक पवार

         सुप्रसिद्ध मराठी चित्रपट गीतकार व अभिनेते मा. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी आज शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. 'लेखक आपल्या भेटीला'या सदराखाली त्यांनी महाविद्यालयातील मराठी विभागात भेट दिली. तत्प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी वरील विचार मांडले. ते पुढे म्हणाले की, जीवनात खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर माणसाने आनंदी रहायला शिकले पाहिजे. त्यासाठी कविता हे एक प्रेरणादायी स्त्रोत आहे. यावेळी त्यांनी'आजोबा', 'बाप'या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर एक प्रेमकविता ही सादर केली आणि वातावरण मिस्किल भावनांनी भरून गेले. शेवटी विद्यार्थ्यांनी विचार व भावनांचा मेळ घालून प्रयत्न केले तर यशाचे शिखर नक्कीच पार करु शकाल असेही त्यांनी सांगितले. 

            मनोगत मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, मा. विनायक पवार यांचे आपल्या संस्थेशी ऋणानुबंधाचे नाते आहे. एका सर्वसामान्य तांड्यावरुन आलेला माणूस चित्रपट गीतकार, अभिनेता व साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवला असूनही त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काव्य लेखन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही सुध्दा चांगले लेखक होऊ शकेल. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ.उज्ज्वला पाटील यांनी करून दिले, तर आभार डॉ. दयानंद कराळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. 


सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...