Career Opportunity

                                                  

                                                      मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी 

१ ) पत्रकारिता - मराठी विषय घेऊन बी.ए .,एम. ए . झालेला विद्यार्थी हा पत्रकार, बातमीदार, अग्रलेख लेखक,           वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक, विभागीय संपादक, स्तंभलेखक, जाहिरात लेखक, मुद्रित शोधक, टंकलेखक, कला,  संगीत, चित्रपट, नाट्य समीक्षक, क्रीडावृत्त लेखक, शोध पत्रकारिता अशा विविध प्रकारची कामे करू शकतो.

२) आकाशवाणी - निवेदक, वृत्तनिवेदक, रेडियो जोकी, कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकटवाचक, मुलाखतकार, बातमीलेखक, बातमी संपादक, श्रुतिका लेखक, नभोनाट्य लेखक, जाहिरात लेखक, संपादक बनू शकतो . 

३) दूरदर्शन - निवेदक, वृत्तनिवेदक, वृत्तसंपादक, संपादक, मालिका लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, महाचर्चा समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, जाहिरात लेखक, जाहिरात दिग्दर्शक होऊ शकतो.

४) चित्रनिर्मिती - चित्रपट कथा लेखक, पटकथा लेखक, गीत लेखक, दिग्दर्शक, निर्माता, व्यवस्थापक, प्रसिद्धी प्रमुख  इत्यादि बनू शकतो .

५) नाट्यक्षेत्र - नाट्य लेखक   दिग्दर्शक, निर्माता, व्यवस्थापक, नेपथ्यकार, प्रकाश व ध्वनि संयोजक  इत्यादि बनू शकतो .

६) सर्जनशील लेखक - कथा, कविता, कादंबरी, नाटक, एकांकिका, ललित, चरित्र इ.चे लेखन करू शकतो .

७) भाषांतर क्षेत्र - अनुवादक, भाषांतरकार, भाषा  तज्ञ, वृत्त अनुवादक, चित्रपट, दूरदर्शन मालिका अनुवादक  बनू शकतो .

८ ) शिक्षण - मराठी भाषा शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, वरिष्ठ  महाविद्यालयीन व विद्यापीठीय प्राध्यापक,

९) संवाद कौशल्य - संवाद्क, सूत्रसंचालन, महाचर्चा, चर्चा, समन्वयक, प्रकट वाचक, निवेदक, मुलाखतकार, जनसंपर्क अधिकारी.

१०) प्रशासन - सर्व शासकीय कार्यालये, मंत्रालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी साहित्य मंडळ, मराठी साहित्य परिषद, विद्यापीठ, विविध उद्योग समूह, भाषा संस्था. 

११) इलेक्ट्रोनिक मीडिया - रीपोर्टर, न्यूज एडिटर, वेब डिझाइनर, ब्लॉग रायटर, न्यूज करस्पोण्ड्ण्ट, विकिपेडिया रायटर, एडिटर

१२) स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत मराठी भाषा, साहित्य, व्याकरण, मुख्य परीक्षेत आवश्यक मराठी पेपर, यूपीएससी एछिक मराठी .       




               मराठी भाषेत ही आहेत करियरच्या काही खास संधी

         मित्र हो, आज अनेकजण शासकीय पदे किंवा गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या यासाठी इंग्रजीची आवश्यकता असल्याचा गैरसमज करून मराठी भाषेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पण याच मराठीमध्ये करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तेंव्हा मराठीला कमी लेखू नका. त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा अनेक संधी आहेत की ज्या मराठी भाषेतून शिक्षण घेऊन आपणास पद, पैसा, प्रतिष्ठा व समाधान मिळवून देऊ शकतात.

        आजच्या जागतिकीकरणाच्या युगात वाढत्या स्पर्धेमुळे आपल्या मुलांनीही वार्‍याच्या वेगात धावायला हवे या हव्यासापोटी आई वडील मुलांची अक्षर ओळख लहानपणापासून इंग्रजीतून करून देतात. तसेच घरात ही मुद्दाम इंग्रजीतच बोलतात. त्यामुळे मराठी असूनही मराठीशी आपले नाते तुटत चालले आहे. याचे कारण आपली मराठी भाषा ही आपल्या उदर्निर्वाहासाठी पुरेशी ठरणार नाही. असा गैरसमज होऊन मराठीच्या जागी इंग्रजी व इतर काही विषयांचे मार्ग निवडले तर आपले करियर चांगले होईल. पण हे सगळे खरे आहे काॽ याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे.

      मित्र हो, जेंव्हा आपण मराठी भाषेचे शिक्षण घेतो तेंव्हा आपोआपच भाषेसोबत आपले वाचन, लेखन, भाषण, श्रवण, साहित्याचा अभ्यास इत्यादि कौशल्ये विकसित होतात. त्यामुळे आपणासाठी बुद्धिमत्तेसोबत कौशल्यावर आधारित नोकर्‍या खुल्या होतात. आता आपण पाहूया की मराठी विषयाचे शिक्षण घेऊन आपण नेमके काय करू शकतो.

१.   शिक्षक वा प्राध्यापक-

      मराठी विषयाकडे आपले दुर्लक्ष होत असले तरी महाराष्ट्रात तो कायम शाळा, महाविद्यालयामध्ये शिकवला जाणारच. त्यामुळे मराठीमधून पदवीचे शिक्षण घेऊन अन्य काही परीक्षा देऊन तुम्ही शिक्षक वा प्राध्यापक होऊ शकता. केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, गोवा, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील काही ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. तिथे ही आपणास संधि मिळू शकते.

२.   मुद्रित शोधन व डिटीपी -

    मराठीत इतक्या भाषा मिसळून गेल्या आहेत की अचूक शब्दांची निवड आणि निर्दोष व्याकरण वापरुन मराठी लिहिणे कुणाला फारसे जमत नाही. क्वचितच काही लोकांना ते जमते. हेच काम मुद्रितशोधक करीत असतात. एखाद्या मजकुराला व्याकरणाच्या चौकटीत बसवून त्याला योग्य शब्दांची जोड देण्याचे काम मुद्रितशोधक करीत असतो. आज प्रसारमाध्यमे आणि प्रकाशनसंस्था यामध्ये मुद्रितशोधकाना चांगली संधि आहे. याबरोबरच डिटीपी चा कोर्स केला तर लिहिलेला मजकूर टाइप करून त्याला डिजिटली सजविण्याचे कसब ही आपणास येते. असे कौशल्य प्राप्त झाल्याने आपण घरबसल्या काम करून चांगली कमाई करू शकतो.

३.   कंटेंटरायटर –

     मराठी भाषेतून शिक्षण घेऊन आपण कंटेंटरायटर होऊ शकता. यात अनेक डिजिटल माध्यमे, पोर्टल यासाठी लेख, बातम्या, संहिता इत्यादिचे लेखन करू शकता. अनेक शासकीय नोकर्‍या, कला विभाग भाषा विभाग येथे संधि मिळते. तसेच स्वत:चे ब्लॉग लिहून, लेख लिहूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकता.याशिवाय भाषेत पीएचडी करून संशोधक, अभ्यासक म्हणून आपणास विविध पदे भूषवता येतात. तसेच  भाषेवर प्रभुत्व मिळवल्याने निवेदक, मुलाखातकर होता येते. याच भाषेत आशय निर्मिती करून यूट्यूबर होऊ शकता.   

४.   प्रसार माध्यमे –

     प्रसारमाध्यमामध्ये मराठी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या माणसांची गरज असते. त्यामुळे वृत्तपत्रे, नियतकालिक, आकाशवाणी, दूरदर्शन इथे भरपूर प्रमाणात मराठी भाषिकांना संधि असते. यात बातमी लेखक, संपादक, निवेदक, संकलक, संवादक अशी विविध पदे असतात.

५.   भाषांतरकार आणि दुभाषिक-

      एखादी गोष्ट इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेतून मराठी मध्ये आणणारे, दर्जेदार आणि अचूक मराठी लिहिणारे, भाषांतर करणारे अनुवादक ही काळाची गरज बनली आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या संधि उपलब्ध असतात. तसेच दोन देशांचा, दोन भाषांचा समन्वय साधायचा असेल तर दुभाषिकांची खरी गरज असते. हीच मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. मराठी सोबत इतर एखादी भाषा शिकून तुम्ही दुभाषिक काम करू शकता. शासकीय कार्यालयापासून ते खासगी कंपनी पर्यन्त या नोकर्‍या उपलब्ध असतात.

६.   स्पर्धा परीक्षा-

       आज जिकडे तिकडे स्पर्धा परीक्षांचे वारे वाहत आहेत. शासकीय अधिकारी होण्यासाठी लाखो तरुण आपले करियर पणाला लावून या परीक्षांचा अभ्यास करत आहेत. अशा परीक्षार्थींसाठी मराठी विषय हे वरदानच आहे. कारण एमपीएससी परीक्षेत याचा मोठा फायदा होतो. पीएसआय, एसटीआय या पदासाठीच्या मुख्य परीक्षेत एकूण २५ टक्के अभ्यासक्रम हा मराठी व्याकरणाचा असतो. तर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, क्लार्क, मंत्रालय सहाय्यक या व इतर अनेक पदांसाठी जी परीक्षा होते त्या प्रत्येक परीक्षेत मराठी विषय असतो. तर यूपीसएससी ला ही मराठी विषय निवडून परीक्षा देता येते.

        अशा प्रकारे मराठी विषय घेऊन पदवी वा पदव्युत्तर शिक्षण  घेतलेल्याना रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यानी घ्यावा.  

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment

सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...